तह्व्वूर राणाच्या कोठडीतआणखी १२ दिवसांची वाढ   

दिल्लीच्या एनआयए विशेष न्यायालयाचा आदेश

मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याच्या कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने सोमवारी दिला.
एनआयएच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रजित सिंह यांनी एनआयएच्या विनंतीनुसार राणाच्या कोठडीत वाढ केली. राणाची १८ दिवसांची कोठडीची मुदत काल संपली होती. त्यामुळे एनआयएने ती वाढवून देण्याची विनंती केली होती. राणाला अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि तोंड झाकून न्यायालयात हजर करण्यात आले. ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी एनआयएच्या बाजू मांडली. दिल्ली कायदा सेवा विभागाचे वकील पियूष सचदेवा हे राणाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 
 
गेल्या वेळी कोठडी सुनावताना राणा याची प्रत्येक २४ तासाला वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने एनआयएला दिले होते. तसेच एक दिवसाआड वकिलांना भेटण्याची अनुमती दिली होती. तेव्हा एक लेखणी वापरण्याची परवानगी राणाला दिली. तसेच संभाषण ऐकता येईल, एवढ्या अंतरावर एनआयए अधिकार्‍यांनी उभे राहावे, अशी सूचना केली होती. 
 
सुनावणीवेळी कोठडी मागण्याची कारणे देखील एनआयने दिली होती. त्यात दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान कसे रचले ?  याचा शोध घेण्यासाठी तसेच हल्ल्यापूर्वी राणा कोठे गेला? याचा तपास करायचा होता.श त्यासाठी त्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जायचे असल्याचे कारणही दिले होते.  
 

दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान रचणारा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली याचा राणा हा प्रमुख साथीदार, मित्र आहे. तो कॅनडाचे उद्योगपती, अमेरिकेचा नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराचा माजी कप्तान देखील आहे. राणाला अमेरिकेच्या न्यायालयाच्या आदेशानुसार ४ एप्रिल रोजी भारताकडे सोपविले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हेडली आणि राणा यांनी रचलेल्या कारस्थानानुसार भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. रेल्वेस्थानकात, दोन आलिशान हॉटेल आणि ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळावर बेछूट गोळीबार केला होता. हल्ल्यात १६६ नागरिकांचा बळी गेला होता. सुमारे ६० तास दहशतवादाचे तांडव मुंबईत सुरू होते. 

Related Articles